‘भाजपमध्ये एकनाथ खडसेंना न्याय मिळाला नाही, मग तुमचं काय ?, आमच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये चला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –    एकनाथ खडसे (Eknath Khadse) समर्थकांनी आता जळगावातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत भाजपचा (BJP) त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) येण्यासाठी आवाहन केलं आहे. ज्या एकनाथ खडसेंनी भाजपसाठी आपलं सर्व आयुष्य वेचलं त्यांना पक्षात न्याय मिळाला नाही. तिथं आपली काय गत होईल याचा विचार भाजप युवा मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करावा आणि त्यांनी आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस यावं असं खडसे समर्थकांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये प्रचंड अन्याय झाला. त्यांच्या या निर्णयाची वाट आम्ही गेल्या एकदीड वर्षापासून पहात होतो. नाथाभाऊ आता राष्ट्रवादीत गेल्यावर आम्ही त्यांच्यासोबत राहू अशी भावना खडसे समर्थकांनी व्यक्त केली.

एकनाथ खडसे गुरुवारीच मुंबईत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज दुपारी 2 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. मुक्ताईनगरमधील त्यांचे समर्थकही मुंबईत आले आहेत. खडसे समर्थकांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, गिरीश महाजन (Girish Dattatray Mahajan) केवळ नाथाभाऊंसोबत आहेत अंस दाखवत होते. परंतु प्रत्यक्षात मात्र ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे मित्र होते. त्यामुळंच ते नाथाभाऊंना सुप्तपणे विरोध करत होते अशी खदखद या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

‘उत्तर महाराष्ट्राला माझ्याकडून अपेक्षा’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी एकनाथ खडसेंनी मुंबईत प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. खडसे म्हणाले, उत्तर महाराष्ट्राला माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. उत्तर महाराष्ट्रात विकासकामांची गरज आहे. त्यासाठी आम्हाला सरकारची साथ हवी आहे असंही त्यांनी सांगितलं.

You might also like