Coronavirus : धक्कादायक ! मुंबई पालिकेतील सहाय्यक आयुक्तांचा ‘कोरोना’मुळं मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिकेच्या वांद्रे विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

अशोक खैरनार ज्या विभागाचे नेतृत्व करत होते, तो एच विभाग कोरोनाला नियंत्रित करण्यात मुंबईत अव्वल ठरला आहे. त्यांनी कोरोनाशी लढण्याचे चांगले नियोजन केले होते. तसेच त्यांनी आपल्या विभागासाठी तयार केलेल्या चतुःसूत्रीचा सकारात्मक परिणामही समोर आला होता. त्यांच्या विभागात कोरोना आता नियंत्रणात आला आहे. मात्र जो वांद्रे परिसर रेझ झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणला, त्या अशोक खैरनार यांचा मात्र कोरोनाने पराभव झाला.

अशोक खैरनार यांची चतुःसूत्री
सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी घरोघरी जाऊन तपासणी करणे, गरजेनुसार घरीच ऑक्सिजन ट्रिटमेंट देणे, प्रभावी क्वारंटाईन आणि प्रतिबंधित क्षेत्रात कठोर नियमांची अंमलबजावणी करणे अशी चतुःसूत्री तयार केली होती. या चतुःसूत्रीमुळेच त्यांच्या विभागातील आठवड्याची सरासरी वाढ ०.९ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. तसेच कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा त्यांच्या विभागातील कालावधी ७६ दिवसांवर गेला आहे.