बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात इरफान खानची पत्नी सूतापाची मागणी, ‘भारतात लीगल व्हावे CBD ऑइल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या बॉलिवूडमधील ड्रग्जचा मुद्दा जोरात चर्चेत आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर सध्या अनेक कलाकार आहेत. यात दीपिका पादुकोण, दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, रकुल प्रीत सिंग, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची चौकशी केली गेली आहे. तर एनसीबीने सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आणि त्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या रिया चक्रवर्ती आणि धर्मा प्रॉडक्शनचे माजी कार्यकारी निर्माता यांनाही या प्रकरणात अटक केली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीवर निशाणा साधला जात आहे. लोक सोशल मीडियावर कलाकारांना प्रचंड ट्रोल करत आहेत आणि इंडस्ट्रीवर टीका करत आहेत. याच दरम्यान इरफान खानची पत्नी सुतापा यांनी भारतात सीबीडी ऑइलला (ड्रगचा एक प्रकार) कायदेशीर करण्याची मागणी केली आहे. सुतापा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी लंडनमधील रुग्णालयाचा एक फोटो शेअर केला आहे, जिथे इरफान खानच्या कर्करोगाचे उपचार झाले होते.

फोटो शेअर करत सुतापा यांनी हेही सांगितले आहे की, त्या सध्या लंडनमध्ये आहेत. ‘लंडनला परत येणे आणि या हॉस्पिटलची खोली प्रत्येक वेळी बाहेरून बघणे, मी असेच केले होते, जेव्हा तो इथे होता.’ #walkingalone #wishyouwerethere #cancerpain #LegalizeCBDoilinindia. ”

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने त्याच्याशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली. या दरम्यान त्याची टॅलेंट मॅनेजर जया शाहची चौकशी आणि तिच्या व्हाट्सऍप चॅट्सच्या माध्यमातून काही कलाकारांची नावे समोर आली. आणि ड्रग पॅडलरशी संबंध ठेवण्याचे आरोप लावले आहेत. या तपासणी दरम्यान एनसीबीने काही ड्रग पॅडलर्सनाही अटक केली आहे आणि काहींची चौकशी केली आहे, जो अद्यापही सुरू आहे.