पोलिसांवर हल्ला करणार्‍यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दंड जमा करण्याचा आदेश, अन्यथा…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लॉकडाउनदरम्यान पोलिसांवर हल्ला करणार्‍या चार जणांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयाने या चौघांनाही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाधीश भारती डांग्रे यांच्यापुढे जामिनावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. चारही आरोपींना दहा हजार रुपयांचा जामीन मंजूर करताना कोर्टाने मुख्यमंत्री निधीमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करावे अन्यथा जामीन रद्द होईल, असा दंड सुनावला.

गोवंडीमध्ये शिवाजी नगर भागात पेट्रोलिंगवर असणार्‍या पोलिसांवर 25 ते 30 जणांनी एप्रिल महिन्यामध्ये हल्ला केला होता. त्यातील काही जणांनी दगडफेक केली आणि पोलिसांचा मास्कही काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून काही जणांना अटक केली होती. त्यापैकी चारजणांना न्यायाधीश भारती डांग्रे यांच्यापुढे हजर केले असता चौघांनाही दहा हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. त्यासोबतच ‘जबाबदार नागरिक होण्यासाठी शिक्षा म्हणून’ प्रत्येकाने मुख्यमंत्री निधीमध्ये पाच हजार रुपये जमा करावे असा दंडही न्यायालयाने सुनावला.

‘पोलिसांनी आरोपींना केवळ संशयातून पकडले आहे. ते फक्त घटना घडली त्या परिसरात राहतात आणि 22 ते 25 या वयोगटातील आहेत म्हणून त्यांना अटक करण्यात आला. त्यांचा घटनेशी काहीही संबंध नाही’, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलाकडून करण्यात आला होता. त्यावर, संशयाच्या लाभाचा हक्क असला तरी, लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांवर उघडपणे हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस पथकाला मारहाण केल्याचा आणि त्यांच्या कार्यालयीन कामात व्यत्यय आणण्याचा परिणाम भोगावा लागेल, असे कोर्टाने म्हटले.