छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत PM मोदींचं मराठीत भाषण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आज स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मकथेचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मदी यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक वीरांची पावनभूमी असलेल्या महाराष्ट्राला वंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वत:ला समर्पित केलं. गरीब, शेतकरी यांचं जीवन जगणं अधिक सोपं केलं. त्यांचं दु:ख अडचणी कमी केल्या. त्यांच्या जीवनाची कथा महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रात ऐकायला मिळेल” असं म्हणत पीएम मोदी यांनी दिवंगत लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचं कौतुक केलं.

पीएम मोदी पुढं बोलताना म्हणतात, “बाळासाहेब विखे पाटील यांनी नेहमीच सत्ता आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजात बदल कसा घडवून आणता येईल, गाव आणि गरिबांच्या समस्या कशा सोडवता येतील यावर त्यांनी नेहमी भर दिला. बाळासाहेब विखे पाटील विचारामुळं वेगळे ठरतात.” असंही मोदी म्हणाले.

पीएम मोदी म्हणतात, “आजही त्यांचा प्रत्येक पक्षात सन्मान होतो. गरीबांच्या विकासासाठी त्यांनी जे कार्य केलं ते पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देईल. बाबासाहेबांनी गरिबांचे दु:ख जवळून पाहिलं, समजून घेतलं आणि त्याच्या भल्यासाठी काम केलं.” असंही मोदी म्हणाले.

“आज शेती आणि शेतकऱ्याला अन्नदाताच्या भूमिकेतून पुढे नेऊन उद्योजक बनवण्यासाठी संधी निर्माण केली जात आहे. एमएसपी असो किंवा युरिया नीम कोटींग आज सरकार शेतकऱ्यांच्या छोट्या-छोट्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आहे.” असंही त्यांनी सांगितलं.