‘कोरोना’च्या फंडातच गोलमाल ! खासदाराच्या अंतर्वस्त्रात सापडले लाखो रूपये

रिओ दि जेनेरियो : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटकाळात आता भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडत आहे. सरकारकडून जो निधी येतो त्यावर डल्ला मारला जात आहे. त्यामध्ये ब्राझीलचे लोकप्रतिनिधीही सामिल असल्याचा आरोप केला जात आहे. भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात एका खासदाराच्या अंतर्वस्त्रातून लाखो रुपये जप्त करण्यात आले. ब्राझीलमधील भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून राष्ट्रपती जॅर बोल्सनारो यांच्या पक्षाच्या चिको रॉड्रिग्स या खासदाराच्या घरावर छापा मारण्यात आला. चिको रॉड्रिग्स यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.रोरिमा राज्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारकडून काही निधी पाठवण्यात आला होता. मात्र, चिको रॉड्रिग्स यांनी या निधीवर डल्ला मारला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. अखेर बुधवारी त्यांच्या घरी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून छापा मारण्यात आला.

भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून सांगण्यात आले कि त्यांच्या अतंर्वस्त्रातून ३० हजार ब्राझिलियन रिअल (जवळपास तीन लाख ८८ हजार रुपये) जप्त करण्यात आले. छापेमारी दरम्यान हे पैसे लपवण्यात आले होते. या छापेमारीनंतर खासदार चिको रॉड्रिग्स यांच्याकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले, पोलिसांनी एका प्रकरणात आपल्या घराची झडती घेतली असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडून घरात सापडलेल्या नोटांबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. चिको रॉड्रिग्स पुढे म्हणाले कि त्यांनी कोणतेही चुकीचे काम केले नाही, हा माझ्या बदनामीचा कट आहे.

राष्ट्रपती जॅर बोल्सनारो संतापले
राष्ट्रपती जॅर बोल्सनारो यांच्याकडून या सगळ्याचं खापर माध्यमांवर फोडण्यात आले आहे. आमचे सरकार भ्रष्ट असल्याचे दाखवण्यासाठी माध्यमांनी ही खोटी कथा रचली आहे. याउलट आमचं सरकार भ्रष्टाचाराविरोधात कडक पावले उचलत असल्याचे या छाप्यातून स्पष्ट झाले आहे. आम्ही कोणताच प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असे राष्ट्रपती जॅर बोल्सनारो यांनी सांगितले आहे.