Lockdown : आर्थिक संकटात अडकलं जगातील सर्वात ‘धनवान’ तिरूपती बालाजी मंदिर, ‘संपत्ती’ लिलाव करण्यासाठी बनवली योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिरुपती बालाजी मंदिर चालवणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्टच्या मते, कोरोना विषाणू लॉकडाऊनमुळे मंदिर व्यवस्थापनाला आतापर्यंत 400 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंदिरातील 8 टन सोन्याचे आणि 14,000 कोटींच्या एफडीला स्पर्श न करता कर्मचार्‍यांचे पगार कसे द्यायचे यावर व्यवस्थापन काम करीत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमने आपल्या 50 स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. या मालमत्ता तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे आहेत. टीटीडी बोर्डाचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी म्हणाले की लिलावासाठी चिन्हित केलेल्या मालमत्तांमध्ये छोटी घरे, प्‍लॉट आणि शेतजमीन यांचा समावेश आहे. ते म्हणाले की या मालमत्ता अनेक दशकांपूर्वी भक्तांनी मंदिराला दान केल्या होत्या.

टीटीडीला यांची देखभाल करणे अवघड होत आहे आणि त्यांपासून कोणतेही उत्पन्न घेतले जात नाही. त्यामुळे टीटीडीने त्यांचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, मंदिर व्यवस्थापनाला या लिलावातून सुमारे 24 कोटींचा महसूल मिळणार आहे, ज्याचा उपयोग कर्मचार्‍यांना पगार व इतर कामांसाठी करण्यात येणार आहे. सामान्य दिवसात मंदिरात 60 ते 80 हजार आणि सणाच्या दिवशी दररोज 1 लाख भाविक दर्शनासाठी येतात. तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे मंदिराच्या व्यवस्थापनासाठी व संचलनासाठी वार्षिक 2500 कोटीचे बजेट आहे. दरमहा मंदिराचे उत्पन्न 200 ते 220 कोटी रुपये आहे. परंतु लॉकडाऊनमुळे गेल्या 2 महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने मंदिरात कोणतेही उत्पन्न झाले नाही. टीटीडीने सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 3309.89 कोटी बजेट ठेवले आहे, परंतु मार्चमध्ये सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे मंदिर बंद झाल्यानंतर देणगी म्हणून मिळणारी रक्कम, जी 150 ते 175 कोटी रुपये आहे, त्या रकमेचे नुकसान झाले आहे.

याशिवाय विशेष सेवा तिकिटे, विशेष दर्शनाची तिकिटे, प्रसाद आणि गेस्ट हाऊस देखील मंदिराच्या मोठ्या उत्पन्नाचे स्रोत आहेत, परंतु लॉकडाऊनमुळे यामधून मिळणारे उत्पन्नही जवळपास शून्य झाले आहे. या मंदिरात केस अर्पण करण्याची परंपरा आहे आणि केसांच्या लिलावातून मंदिर व्यवस्थापनाला वर्षाकाठी 400 कोटींची कमाई होते. हजारो कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये व इतर खर्चामध्ये दरवर्षी 1385.09 कोटी रुपये खर्च केले जातात. टीटीडीला आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारावर दरमहा 120 कोटी रुपये खर्च करावे लागतात. लॉकडाऊनच्या वेळी मिळणारे उत्पन्न हे शून्य आहे परंतु खर्च तेवढाच होत आहे. याशिवाय टीटीडीकडून चालवण्यात येणाऱ्या मोफत रुग्णालयांना वर्षाकाठी 400 कोटींचे अनुदान द्यावे लागते.