कामशेतमध्ये सराईत गुन्हेगाराच्या घरातून तब्बल 86 लाखांचा गांजा जप्त

कामशेत/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मावळ परिसरातून सराईत गुन्हेगाराच्या घरातून तब्बल 86 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि कामशेत पोलिसांनी संयुक्तपणे केली. या कारवाईत पोलिसांनी 578.500 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर सराईत गुन्हेगार फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संतोष रामचंद्र वाळुंज (रा.दौंडे कॉलनी, पवना नगर रोड,कामशेत ता.मावळ जि.पुणे) व) धनाजी विठ्ठल जिटे (रा. ताजे, ता.मावळ, जि.पुणे सध्या रा. संतोष वाळुंज चाळ, पवनाचौक, पवनानगर रोड, कामशेत, ता.मावळ) अशी गुन्हेगारांची नावे असून पोलिसांनी धनाजी जिटे याला अटक केली आहे. तर सराईत संतोष वाळुंज हा फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत मुख्य आरोपी संतोष याच्या घराच्या खाली तळघरामध्ये गांजा लपवण्यासाठी जागा केली होती. या ठिकाणी तब्बल 578.500 किलो ग्रॅम वजनाचा गांजा लपविण्यात आला होता. याची माहिती लोणावळा सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाली होती. कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व पोलीस कर्मचारी तसेच श्वान पथकासह संतोष वाळुंज याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी मुख्य आरोपी संतोष वाळुंज हा पळुन गेला. तर धनाजी जिटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी घराची झडती घेतली असता घराच्या तळघरामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांना 578.500 किलो ग्राम असा एकुण 86 लाख 77 हजार 500 रूपयांचा गांजा जप्त केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.