पुलावरुन वाहणार्‍या पाण्यातून ‘तो’ कार सोबत वाहून गेला

पोलिसनामा ऑनलाईन – नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दोन दिवस जोरदार बॅटिंग केली आहे. मुसळधार पावसाने मनमाड शहर परिसराला अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे नांदगाव इथे रस्त्यावर मोठ्या प्राणात पाणी साठल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. तरीही हिसवळ खुर्दच्या पुलावरून वाहतूक सुरू होती. याचदरम्यान एक कार पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नांदगाव इथे काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हिसवळ खुर्दच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. पूलावर पूरस्थिती निर्माण झाली असतानाही त्यावरून धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. ही वाहतूक सुरू असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि त्यासोबत कार वाहून गेली. पुलावर जास्त पाणी आहे कार घेऊन जाऊ नको असे अनेकांनी सांगितल्यानंतरही वाहन चालकाने त्यांचे ऐकले नाही. कार पुराच्या पाण्यातून नेण्याचे धाडस केले. पुरात वाहून गेलेली कार अद्यापही मिळाली नाही. या कारमध्ये किती प्रवासी होते याची अद्याप कोणतीच माहिती मिळू शकली नाही.