Lockdown 3.0 : वादग्रस्त पूनम पांडेला मित्रासोबत फिरणं पडलं महागात, मुंबई पोलिसांकडून FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – कायम वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणार्‍या मॉडेल पूनम पांडेवर तिच्या मित्रासह मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनच्या काळात विनाकारण शहरात फिरत असल्याने मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पूनम पांडे ही तिच्या अलिशान कारमधून रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बाहेर फिरत होती. लॉकडाऊन असल्याने पोलिसांनी तिची गाडी अडविली. तिच्यासोबत तिचा मित्र सॅम अहमद बॉम्बे (वय ४६) हाही होता. लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरत असल्याने पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली आहे. तिच्याविरुद्ध १८८, २६९ आणि ५१ बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तिची बीएमडब्ल्यु कारही ताब्यात घेतली आहे.

पूनम पांडे हिला पोलिसांनी अटक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ६ वर्षांपूर्वीही तिला भावासोबत वाहन चालवत असताना वाहतूकीच्या नियमांचा भंग केल्यावरुन मुंबई पोलिसांनी अटक केली होती.