बिर्याणी फुकट न दिल्याने कोयत्याच्या धाकाने हॉटेलचालकाला लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनालईन – बिर्याणी फुकट न दिल्याने तीन सराईतांनी हॉटेलचालकाला कोयत्याचा धाक दाखवत गल्ल्यातील पैसे काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आकाश संतोष भारती व अऱविंद संतोष उपाडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर त्यांच्या साथीदार सुरज रमेश पंडीत याचा शोध सुरु आहे. याप्रकरणी कलीम जिल्लेदार खान (महंमदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलीम खान यांचा केटरींगचा व्यवसाय आहे. ख्वाजा गरीब नवाज नावाने महंमदवाडी येथील तरवडे वस्ती येथे त्यांचे हॉटेल आहे. दरम्यान आकाश भारती हा सराईत असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल आहे. आकाश भारती आणि त्याचे साथीदार नेहमी खान यांच्या दुकानात येऊन नेहमी त्यांना बिर्याणी फुकटात मागत होते.

ते शनिवारीदेखील त्यांच्या दुकानात आले. त्यावेळी तिघांनी त्यांना फुकट बिर्याणी मागितली. त्यांनी तिघांना बिर्याणी देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना राग आला. त्या रागातून तिंघांनी खान यांना कोयत्याचा धाक दाखवत काउंटरच्या गल्ल्यातून ४८०० रुपये काढून घेतले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेटे करत आहेत.

Loading...
You might also like