CBSE Results 2020 : सीबीएसई 10 वी आणि 12 वी निकालांबद्दल जाणून घ्या ताजे अपडेट, मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) १० वी, १२ वीचे बोर्ड निकाल १५ जुलै पर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. मंडळाने २६ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली होती. तसेच उर्वरित पेपर्सचा निकाल विद्यार्थ्यांची मागील परीक्षा आणि अंतर्गत मूल्यांकन कामगिरीच्या आधारे लावला जाईल, अशी माहितीही मंडळाकडून देण्यात आली होती.

मंडळाने आधीच सांगितले आहे की, ते दहावीची प्रलंबित परीक्षा घेणार नाहीत. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण वाढवण्याची संधी म्हणून प्रलंबित पेपरमध्ये बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र परिस्थिती सुधारल्यानंतर प्रलंबित पेपर आयोजित केले जाणार आहेत.

मंडळाने पूर्व-आयोजित बोर्ड परीक्षेसाठी मूल्यांकन प्रक्रिया १० मे २०२० रोजी सुरू केली होती. यावर्षी ३,००० नियुक्त केलेल्या शाळांकडून पात्र मूल्यांकनकर्त्यांच्या घरी उत्तरपत्रिका पाठवली गेली, जी त्यांनी त्यांच्या घरातून तपासली. सुमारे १७३ विषयांच्या सुमारे १.५ कोटी उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी पाठवण्यात आल्या.

सुमारे १८ लाख विद्यार्थी दहावीच्या आणि बारा लाख विद्यार्थी १२ वीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in, cbse.nic.in आणि results.nic.in वर ऑनलाइन निकाल पाहता येईल.