कुंजीरवाडीत अत्याधुनिक CCTV कॅमेरे

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन – गावच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजनांचा समावेश विकास आराखड्यात करण्यात आला. अनेक योजना कार्यान्वित करुन पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी हे गाव रोल माॅडेल होताना दिसत आहे. सध्या या गावात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम चालू असून लवकरच याद्वारे गावातील प्रत्येक हालचालीवर ग्रामपंचायत तसेच पोलिस प्रशासन लक्ष ठेवणार आहे.

पुणे शहरापासून जवळच असलेल्या व शहराचे उपनगर होऊ घातलेल्या कुंजीरवाडी गावचा विकास करताना सरपंच सुनिता संदीप धुमाळ व त्यांचे सहकारी उपसरपंच नाना कुंजीर, माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून अनेक योजना हाती घेण्यात आल्या. कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सोय, रस्ते स्वच्छता, आरोग्य शिक्षण अशा गावच्या मुलभुत सोयी बरोबरच सुरक्षेचा महत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे ठरले. परंतु अनेक वेळा यात खुप अडचणी येतात यासाठी या ग्रामपंचायतीने अत्याधुनिक वाय फाय कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला.

यामध्ये पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊरफाटा तसेच कुंजीरवाडी मुख्य चौक येथे प्रत्येकी तीन तर शाळा जाॅगींग ट्रॅक जवळ वर्तुळाकार फिरणारे कॅमेरे बसवण्याचे ठरले. या उपक्रमांमुळे भविष्यात पोलिस प्रशासनाला गुन्हेगारी व चोरी यावर वचक ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

तसेच आपला गाव आपला विकास अंतर्गत कुंजीरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक वाड्यावस्त्या येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव मांडला आहे अशी माहिती सरपंच सुनिता धुमाळ यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा –