पंतप्रधान जीवन रक्षा पदकांसाठी मुदत संपल्यानंतर आयुक्तालयाकडून पत्र

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारकडून देशातील विविध सुरक्षा दलांमध्ये विशेष कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना दरवर्षी वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. मात्र, बहुतांशवेळी मुदत संपल्यानंतरच पोलीस विभागाकडून माहिती देण्यात येत असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये पंतप्रधान सुरक्षा रक्षक पदाच्या अधिसूचनेनंतर असा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे.

नागपूर पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणारे अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत. पोलीस दल व सुरक्षा दलांमध्ये उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी करणार्‍यांना पंतप्रधान जीवन रक्षा पदकांसाठी केंद्र सरकारकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्याचे पत्र पोलीस महासंचालक कार्यालयाने 26 ऑगस्टला सर्व पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त आणि विविध सुरक्षा विभाग प्रमुखांना पाठवले. नागपूर पोलीस आयुक्तालयाला हे पत्र 6 सप्टेंबरला मिळाले. पोलीस आयुक्तालयातून हे पत्र पोलीस ठाण्यांमध्ये 10 सप्टेंबरला पोहोचले आहे. पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 सप्टेंबर होती. परिणामी अनेकांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याची इच्छा असतानाही केवळ मुदत संपल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.