E-Pass रद्द केल्यानंतर आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी, उद्यापासून बुकिंग सुरू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    टाळेबंदी शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास सक्ती रद्द करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. त्यानंतर आता मध्य रेल्वेने सुद्धा राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याबाबत परिपत्रक काढलं असून, उद्यापासून (२ सप्टेंबर) रेल्वे बुकिंग सुरु होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या या पत्रकात २ सप्टेंबरपासून आरक्षण पद्धतीने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. सर्व प्रवाशांना आता राज्यांतर्गत प्रवासासाठी २ सप्टेंबरपासून तिकीट बुकिंग करता येईल. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. टाळेबंदीच्या काळात परराज्यातील मजुरांना विशेष श्रमिक ट्रेन्स चालवण्यात आल्या. तसेच मुंबईत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी विशेष मर्यादित लोकल सुरु आहेत. मुंबई लोकलबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. त्याचवेळी मध्य रेल्वेने परिपत्रक जारी करत आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी दिली आहे.

केंद्र सरकारने आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध उठवण्याची सूचना केली होती. तसेच नागरिकांमधून सुद्धा सातत्याने ई-पास बाबत नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ई-पास सक्ती रद्द करत प्रवासावरील निर्बंध काढल्याची काल घोषणा केली. नवी मार्गदर्शक तत्वे बुधवार, २ सप्टेंबरपासून अमलात येतील आणि ई-पास सुद्धा रद्द होईल. नव्या अधिसूचनेनुसार सरकारी आणि खासगी कार्यालयातील उपस्थितीचे प्रमाण वाढवण्यात आलं आहे. केंद्र सरकारने मेट्रो रेल्वे सुरु कारण्यास मुभा दिली असली तरी राज्यात आणखी महिनाभर तरी मेट्रो बंदच राहील.