शरद पवारांसारख्या नेत्याला मातोश्रीवर वारंवार जावं लागणं शोभतं का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकार आणि त्यांच्या नेत्यांवर टिका करत आहेत. आता चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरून आघाडी सरकारवर टिका केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शरद पवार यांना अनेकदा मातोश्रीवर जावे लागले आहे. मागील 6 महिन्यात ते किमान 4 वेळा तरी मातोश्री गेले आहेत. पवारांसारख्या मोठ्या नेत्याला असे करणे शोभत नाही, असे म्हणत पाटील यांनी पवारांना डिवचले आहे.

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी लॉकडाऊनसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, आर्थिक स्थिती बिघडत चालल्याने लॉकडाऊन करणे परवडणारे नाही. संसर्ग रोखण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. नियम न पाळल्यास कठोर कारवाई करावी लागेल. या स्थितीत गरीबांसाठी भाजप पुढाकार घेणार आहे. पुण्यात हातावर पोट असलेल्यांना एक महिन्यासाठी नोकरी, तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी विलगीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजपा मदत करणार असल्याचे पाटील म्हणाले.

सारथीच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, विजय वडेट्टीवार म्हणतात मी राजीनामा देणार. पण राजीनामा देऊन काहीही होणार नाही. त्याऐवजी रचनात्मक काम करून प्रश्न मार्गी लावा. सरकारने काढून घेतलेली सारथीची स्वायतत्ता द्यावी. तसे आश्वासनही सरकारने दिले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीवर टिका करताना पाटील म्हणाले, मराठा समाज मागास आहे हे स्पष्ट आहे. आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. तोपर्यंत ओबीसींना मिळणार्‍या सर्व सवलती मराठा समाजाला देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. विद्यार्थांची फी भरली होती. यावर्षी हे सरकार काय करणार माहीत नाही. आरक्षणाची केस महाराष्ट्र सरकारने ताकदीने चालवावी. कोणत्याही स्थितीत स्टे मिळू नये यासाठी काळजी घ्यायला हवी. या विषयात सरकारने विरोधी पक्षाला सोबत घ्यावे. चर्चा करण्यात गैर वाटून घेऊ नये.

सध्या कोरोना संकटाबाबत महाराष्ट्रातील स्थितीबात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस रोज कुठे ना कुठे जात आहेत. त्यांना कोरोनाची भीती नाही का? परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेरच पडत नाहीत. कोरोना काळात आतापर्यंत ते फक्त दोनदा बाहेर पडले आहेत. एवढेच नव्हे, मातोश्रीवर सुद्धा ते कुणाला भेटत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी असे केले तर कसे होणार.