… त्यासाठी घर सोडून बांधावर जावे लागते, चंद्रकांत पाटीलांचा मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात अतिवृष्टीने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही, त्यासाठी बांधावर जावे लागते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे सोमवारी (दि. 19) अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीत बोलताना चंद्रकांत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडणार आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचेही त्यांनी म्हटले. राज्य सरकरने मदतीबाबत केंद्राकडे मागणी केली का? राज्य सरकारने कागदावर नुकसानीचा तपशील नोंदवला आहे का?, असे सवाल पाटील यांनी उपस्थित केले.

आगामी काळात यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासह अन्य मागाण्यांसाठी आंदोलने करावी लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच सत्ताधारी पक्षातील काही आमदार सरकारमधून बाहेर पडण्यासाठी आग्रही असल्याचा दावाही पाटील यांनी केला.

ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका
राज्यात अतिवृष्टी आणि कोरोनाचा कहर सुरु असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारभार करण्याच्या कार्यपद्धतीवर आता चौफेर टिका होऊ लागली आहे. राज्यातील प्रमुुख नेते बाहेर पडून नुकसाग्रस्त भागाची पाहणी करत असताना मुख्यमंत्री का बाहेर पडत नाहीत, अशी टीका होत आहे.

विधानपरिषद मिळणार असल्याने शेट्टी शांत
एरवी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना विधानपरिषदेचे वेध लागल्याने ते शांत बसले आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.