पुण्यात ‘दादा’गिरीच !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार असे वातावरण होते. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर भाजपला सरकार स्थापनेपासून दूर रहावे लागले. भाजपला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. त्यामुळे अनेकांची पालकमंत्री होण्याची संधी हुकली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे त्यांची ही संधी हुकली.

आधीच्या सरकारमध्ये विधानपरिषद सदस्य असलेले चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. कोथरूड विधानसभा मतदारसंघात विरोध होत असतानाही त्यांनी विरोधकांना शांत करून विजय मिळवला. राज्यात भाजप सत्तास्थापन करणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजप सत्तेपासून दूर झाले. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले.

पुण्याच्या कारभाऱ्यावरून राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते. मागील पाच वर्षाच्या काळात गिरीश बापट यांच्याकडे पुण्याचा कारभार होता. तर त्याआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पुण्याचे कारभारी होते. बापट हे केंद्रात गेल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद येणार अशी शक्यता होती. मात्र, सत्ता गेल्यामुळे त्यांची ही संधी हुकली असून पुण्याचे पालकमंत्रीपद पुन्हा अजित पवारांकडे येण्याची शक्यता आहे.

Visit : policenama.com