उद्धव ठाकरेंना सध्या हिंदुत्वापेक्षा मुख्यमंत्र्यांची खुर्ची महत्त्वाची वाटते : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राम जन्मभूमी बाबत काहीही न करता आम्हीच सर्व केले, हा दावा अनेकजण करत आहेत, असा टीकेचा बाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी शिवसेनेवर मारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिदुत्वापेक्षा सध्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची महत्त्वाची वाटत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, येत्या 5 ऑगस्टला अयोध्या येथे राम मंदिर भूमीपूजनाचा समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अनेक वर्षे ज्या क्षणाची रामभक्त वाट पहात होते, तो क्षण आला आहे. तीन कोटी जनता तेथे प्रत्यक्ष या स्वप्नपूर्तीचा आनंद घेणार होती. मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ भव्य दिव्य करता येत नाही. हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने व्हावा, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर विश्व हिंदू परिषदेने टीका केली. तीन कोटी नाही पण किमान तीनशे लोकांनी तेथे प्रत्यक्ष उपस्थित राहून या समारंभाचे नियोजन केले आहे.

राम मंदिराच्या भूमीपूजनाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे, त्यामुळे त्यांची अडचण झाल्याचे सांगताना पाटील म्हणाले, या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रणाची गरज नाही, असे खासदार संजय राऊत म्हणत होते. आता मात्र निमंत्रण दिल्यानंतर कार्यक्रमाला जायचे की नाही या पेचात मुख्यमंत्री अडकले आहेत. कारण त्यांना आता हिंदुत्वापेक्षा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची महत्त्वाची वाटत आहे. ही खुर्ची टिकवायची असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दुखावणे परवडणारे नाही, असे त्यांना वाटत असावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.