‘चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफार्म ‘तो ‘ होतो म्हणून त्यांनी राग मानू नये’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना ( Chandrakant Patil) जोरदार टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शेलक्या शब्दात चंद्रकांत पाटील यांचाया खरपूस समाचार घेतला. मात्र त्यानंतर पाटील यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मी फक्त कायदेशीर बाबींचा संदर्भ घेऊन बोलत होतो, अशी सारवासारव करत अनेकवेळा राष्ट्रवादीचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. तसेच देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या तर मला ‘चंपा’ संबोधतात ते कसे काय चालते? अशा शब्दात टीकाकारांना प्रतिसवाल पाटील यांनी केला होता. मात्र या प्रश्नाला उत्तर देतानाच जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.

पुणे पदवीधर निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ जयंत पाटील हे पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री पाटील पुढे म्हणाले की,चंद्रकांत पाटील जिथे जातात तिथे प्रश्नच निर्माण करतात. कारण चंद्रकांत पाटलांसाठी भाजपच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना कोथरूड विधानसभा मतदार संघाचे तिकीट नाकारण्यात आले. त्यानंतर तिथे पाटील आमदार झाले. त्यामुळे नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी यांना पक्षाकडून पदवीधर निवडणुकीसाठी आपला विचार होईल अशी अपेक्षा होती.

मात्र भाजपने पदवीधर निवडणुकीत देखील त्यांना तिकीट नाकारले. त्यांच्याऐवजी संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी पुण्यात येऊन काय प्रश्न निर्माण केले ? हे माझ्यापेक्षा मेधा कुलकर्णीच चांगल्या प्रकारे सांगतील अशा शब्दात जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला.

You might also like