मराठा आरक्षण म्हणजे राजकारणाचा विषय नाही : छत्रपती संभाजीराजे

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या असून त्यावर काल व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे म्हणणे मांडण्यास अडचणी येत असल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास सरकारने आणून दिले. त्यानंतर सुनावणी होईपर्यंत नोकर भरती करु नये, असे सांगत न्यायालयाने याचिकांवर 1 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय दिला. दरम्यान, यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया देत मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. याबाबत सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकदिलाने काम करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

सत्ताधारी पक्षाने मराठा समाजातील समन्वयकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांनासुद्धा विश्वासात घेण्याची गरज आहे. आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. त्यांनी फेसबुक अकाऊंटवरून मत व्यक्त केले आहे. मराठा समाजाने प्रचंड त्यागातून आत्तापर्यंतचा पल्ला गाठला आहे. याबाबत केंद्र शासनानेसुद्धा सहकार्य करणे गरजेचे आहे.

मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाची सुनावणी ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेऊ नये आणि हा मुद्दा 5 न्यायाधीशांच्या संवैधानिक पीठाकडे पाठवावा अशी समाजाची आणि माझी सुद्धा सुरुवाती पासून मागणी आहे. त्याकरिता न्यायालय 25 ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार आहे. त्यावेळी शासनाने जोरदार मोर्चेबांधणी करणे आवश्यक आहे. पुढील सुनावणीवेळी समाजाची बाजू भक्कम पणे मांडली जाईल असा विश्वास व्यक्त करत असल्याचेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.