जमीनीच्या वादातून फिल्मीस्टाईल अपहरण, ६ जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जमीनीच्या वादातून एकाला डोळ्याला रुमाल बांधून जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. मात्र स्थानिकांनी प्रकार पाहून पोलिसांना फोन केला. तेव्हा पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान अपहरणकर्त्यांची गाडी पोलिसांनी अडवून त्यांना अटक केली. हा प्रकार गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास बाणेर येथे घडला.

मुकेश राजाराम आसावले (वय २२, वडगाव शेरी), सुरज संदिप सणस (वय २०,मु. पो. सुरवड, ता. वेल्हे), उत्तम राजाराम चोरगे (वय १९, रा. मुं पो. कोळवडी वेल्ला), रोहित पंढरीनाथ चोरगे (वय १९, शांतीनगर, कात्रज), संताजी तानाजी भोसले (वय २१, मु. पो. विंजर), अक्षय तुकाराम धरपाळे (वय १९) अशा सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर मार्थी व्यंकटरत्नम दिनकर (वय ४०, रा. सोपानबाग, बालेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अटक केलेल्या ६ जणांसह मनोज कजबेकर व एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर हे २०१६ साली शिवविश्व डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीत डायरेक्टर पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांचे भावडीगाव वाघोली येथे असलेल्या जमीनीवरून व पैशांवरून मुकेश आसवले व मनोज कजबेकर यांच्याशी वाद झाले होते. त्त्यांच्यात तो वाद बराच काळ सुरु होता.

दरम्यान गुरुवारी रात्री मार्थी दिनकरन हे बाणेर रोड येथील सुवर्णा भागवती बिल्डींग समोर आर. के. कन्सल्टंट येथे फोनवर बोलत अउभे होते. त्यावेळी एका स्विफ्ट गाडीतून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्यांना डोळ्याला रुमाल बांधून जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर तेथे असलेल्या काही लोकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला गाडीचा क्रमांक व घडला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केली.

पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांना पकडून दिनकर यांची सुटका केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दोडमिसे करत आहेत.