नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ५ जवानांसह भाजपच्या आमदाराचा मृत्यू

दंतेवाडा : वृत्तसंस्था – देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर असतानाचा नक्षलवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला आहे. छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित दांतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करून हल्ला घडवून आणला. नक्षलवाद्यांनी ताफ्याला लक्ष्य करून आयईडीद्वारे घडवलेल्या स्फोटात ५ जवानांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात भाजपचे आमदार भीम मंडवी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भाजपा आमदार भीमा मंडवी हे सभा आटोपून येत असताना त्यांच्या ताफ्याला लक्ष्य करून नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात आमदार मंडवी यांच्या ताफ्यात असलेल्या सुरक्षा दलाच्या वाहनाची हानी होऊन छत्तीसगड पोलीस दलाचे ५ जवानांचा मृत्यू झाला. हा स्फोट एवढा भीषम होता की बुलेटप्रूफ गाडीच्या ठिकऱ्या उडाल्या. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी ताफ्यावर तुफान गोळीबार केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक उडाली होती. या चकमकीत बीएसएफच्या चार जवानांना वीरमरण आले होते. तर अन्य दोन जवान जखमी झाले होते. कांकेरमधील प्रतापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महला गाव येथे बीएसएफच्या 114 व्या बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक उडाली होती.