‘लॉकडाऊन’मध्ये 100 किलोनं वाढलं ‘या’ तरूणाचं वजन, आता 250 च्या ‘पार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे वुहान शहर तब्बल पाच महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये होते. दरम्यान, वुहान शहरातील 26 वर्षीय तरूणाचे अचानक 100 किलो वजन वाढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळे तो वुहानचा सर्वाधिक वजन असणारा व्यक्ती बनला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, या तरूणाचे नाव झोऊ असून तो तब्बल 5 महिन्यांपासून घरात कैद होता. अचानक वजनात वाढ झाल्यामुळे झोऊ गंभीर आजारी पडला, त्यानंतर जूनच्या सुरुवातीला रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, 26 वर्षीय झोऊचे पाच महिन्यांत 100 किलो वजन वाढले आहे. त्यानंतर, आता त्याचे वजन 280 किलो आहे. त्याला वुहान विद्यापीठाच्या झोंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी म्हटले आहे की, झोऊ अनेक वर्षांपासून वजनाशी झगडत आहे. वजन कमी करण्यासाठी त्यांनी विविध पद्धती वापरल्या आहेत, परंतु त्याला कोणतेही यश मिळाले नाही.

झोऊ एका इंटरनेट कॅफेमध्ये काम करायचा. जानेवारीच्या उत्तरार्धात वुहान शहरात लॉकडाऊन लागू झाल्यापासून तो घरात राहत होता. पण यावेळी अचानक त्याचे वजन वाढले. त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, वजनामुळे त्याला चालण्यातही त्रास होऊ लागला. लॉकडाऊन आणि संसर्ग पसरण्याच्या भीतीने त्याने उपचार घेतले नाहीत.

वुहान युनिव्हर्सिटीच्या झोंगनन हॉस्पिटलमधील डॉक्टर ली झेन यांना 31 मे रोजी झोऊचा फोन आला आणि त्याने मदतीसाठी विचारणा केली. त्यानंतर सहा बेडवर सहा सुरक्षा कर्मचारी आणि चार वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. असे म्हटले जात आहे की, 2019 वर्षाच्या अखेरीस त्याचे वजन 177 किलो होते.

झोऊ वजन कमी करण्यासाठी ऑपरेशन करण्यास तयार आहे, परंतु शस्त्रक्रियेचा धोका कमी करण्यासाठी, येत्या तीन महिन्यांत त्याला काही वजन कमी करावे लागेल. त्याची कहाणी रुग्णालयाने सोशल मीडिया पोस्टवर उघडकीस आणली आहे. तथापि झोऊच्या अचानक वजन वाढण्याचे अचूक कारण रुग्णालयाने दिले नाही.