चीन भारताला सर्व बाजूंनी घेरतोय, शरद पवारांनी मोदी सरकारला दिला इशारा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   दक्षिण चीन समुद्रात वाढत असलेलं चीनचं वर्चस्व हे गंभीर आहे. त्याच बरोबर श्रीलंका नेपाळच्या धोरणांवरही अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे. चीन भारताला सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत आहे असा इशाराही शरद पवार यांनी दिला आहे. चीन प्रश्नावर चर्चा करण्यासाठी त्यांनी मुंबईत तज्ज्ञांना आमंत्रित करुन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मोदी सरकारला सल्ला दिला असल्याची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली.

माजी परराष्ट्र सचिव व चीन विषयीचे तज्ज्ञ समजले जाणारे विजय गोखले आणि हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांना पवारांनी आपल्या निवासस्थानी चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. चीन विषयाचे तज्ज्ञ असलेल्या विजय गोखले यांनी आपले अनुभव सांगताना सध्याच्या परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं. तर भूषण गोखले यांनी संरक्षणाची बाजू सांगितल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

दरम्यान, भारत आणि चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भारताला घेरण्यासाठी आणि जगभर दबदबा निर्माण करण्यासाठी चीन भारताच्या सभोवतालच्या 12 देशांमध्ये तळ उभारत असल्याची माहिती उघड झाली आहे. अमेरिकेच्या पेंटागॉनने यासंबंधीचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

पाकिस्तान, म्यानमार आणि श्रीलंका या भारताला लागून असलेल्या देशांमध्ये चीनने लष्करी तळ बनवले आहेत. तर थायलँड, सिंगापूर, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमीरात, केनिया, सेशल्स, तांजानिया, अंगोला आणि तजाकिस्तानमध्ये लष्करी तळ बनवण्यासाठी चीन तयारी करत आहे.