रशियाच्या मॉस्कोत भारत-चीनच्या संरक्षण मंत्र्यांची होणार भेट, सीमाप्रश्नावर होणार चर्चा

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ’शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी रशियाची राजधानी मॉस्कोत पोहचले आहेत.

याबाबत नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह आपले समकक्ष – चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंगे यांची थोड्याच वेळात भेट घेणार आहे. रात्री 9.30 वाजता ही भेट होणार असून भारत-चीन सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर रशिया देशात होणारी भारत आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांची ही भेट महत्त्वाची ठरणाराय.

यापूर्वी चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंगे यांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे शुक्रवारी बैठकीसाठी वेळ मागितली होती. भारताकडून यावर कोणतंही उत्तर दिलं नव्हतं. परंतु, आता मात्र ही भेट होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यापूर्वी राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांची देखील भेट घेतली होती.

‘भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर’
पूर्व लडाखमधील चीन सीमेवरील परिस्थिती थोडीशी नाजूक आणि गंभीर आहेे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी शुक्रवारी म्हटलं आहे. मात्र, लष्कराने उचललेल्या खबरदारीच्या पावलांमुळे ही परिस्थिती निवळण्यास मदत होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषवरील तणावपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी गुरुवारी लेहमध्ये, तर शुक्रवारी लडाखचा दौरा केलाय.

दोन दिवसांच्या या दौर्‍याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ’सीमेवरील सद्यस्थिती काहीशी नाजूक आणि गंभीर आहे. पण, आम्ही त्याबद्दल विचार करत आहे. सैन्याच्या सुरक्षेसाठी आम्ही काही सावधगिरीची पावले उचलली आहेत. आम्हाला खात्री आहे की परिस्थिती नियंत्रणात येईल. काल लेह दौर्‍यावर असताना मी विविध ठिकाणांना भेट दिलीय. तसेच लष्करी अधिकार्‍यांशी देखील चर्चा केलीय.

आपल्या जवानांचे आणि अधिकार्‍यांचे मनोबल खंबीर आहे. ते कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार आहेत, मी असं म्हणेन की आपले जवान सर्वोत्तम आहेत’ असेही त्यांनी म्हटलं आहे.