चायनीज अ‍ॅपवर बंदी घातल्यानं चीनी मिडीयाला लागली मिर्ची, भडकून दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   चीनसोबत सीमेवरील वादामुळे भारताने ड्रॅगनला धडा शिकवण्यासाठी जगातील सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप्स पैकी एक असणाऱ्या टिक-टॉकसह 59 चीनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. चिनी अ‍ॅप बंद झाल्यावर चीनच्या शी जिनपिंग सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी तेथील राज्य माध्यमांना चांगलीच मिरची लागली आहे. चिथावणीखोर प्रतिक्रिया व्यक्त करताना चिनी सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने भारताची तुलना अमेरिकेशी करत म्हटले की, चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी भारतही अमेरिकेसारखी सबब शोधत आहे. चीनकडून मालवेयर, ट्रोजन हॉर्सेस आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगत अशी निर्बंध लादणे हे चुकीचे पाऊल आहे, असा आरोप या वर्तमानपत्राने केला आहे.

वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार अमेरिकेनेही चीनच्या वस्तूंना राष्ट्रवादाच्या आड लक्ष्य करण्यास सुरुवात केली. दरम्यान, अशा प्रकारच्या निर्णयामुळे केवळ भारताच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल, असा पुनरुच्चार चिनी माध्यमांनी केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावरही मेम्सचा पाऊस पडला आहे. यावर लोक मजेदार मेम्स शेअर करत आहेत. अ‍ॅप्सवर बंदी घालण्याबाबत टिक- टॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले आहे – “आम्ही आदेश स्वीकारत आहोत आणि आपली उत्तरे व स्पष्टीकरण देण्यासाठी सरकारी एजन्सींना भेटत आहोत.”

त्यांनी म्हंटले की, टिक- टॉक भारताच्या कायद्याचा आदर करतो आणि टिक- टॉकने भारतीय लोकांचा डेटा चीन सरकारकडे किंवा इतर कोणत्याही देशाच्या सरकारला पाठविला नाही. जरी आम्हाला तसे करण्यास सांगितले तर आम्ही तसे करणार नाही. ते पुढे म्हणाले की, टिक- टॉकने इंटरनेटला अधिक लोकशाहीदृष्ट्या मजबूत बनविले आहे. टिक- टॉक 14 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि यावर लाखो लोक ज्यात कलाकार, कथाकार, शिक्षक आहेत जे त्यांच्या रोजीरोटीवर अवलंबून आहेत. कंपनीचा दावा आहे की, यातील बरेच लोक पहिल्यांदा इंटरनेट वापरणारे आहेत. दरम्यान, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, वापरकर्ते प्रश्न उपस्थित करत आहेत कि, ही कोणत्या प्रकारची बंदी आहे आणि केव्हा ही बंदी प्रभावी होईल, कारण हे अ‍ॅप्स अद्याप कार्यरत आहेत आणि ते अद्याप प्ले स्टोअर आणि इतर अ‍ॅप स्टोअरमध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. मग त्याला बंदी कशी म्हणता येईल.

ट्विटरवरील टॉप 10 मध्ये ट्रेंड करणारे हॅशटॅग, सर्व चिनी अ‍ॅप्सशी संबंधित
1. #TikTok
2. #PUBG
3. #59 Chinese Apps
4. #UC Browser
5. #Government of India
6. #Shareit
7. #DigitalAirStrike
8. #ChineseAppsBlocked
9. #Jayaraj_And_Fenix
10. #CamScanner

माहितीनुसार, भारत सरकारच्या या निर्णयावर टिक- टॉक प्रवक्त्याने म्हटले आहे की, भारत सरकारने 59 अ‍ॅपवरील बंदीबाबत अंतरिम आदेश दिला आहे. बिटडन्स टीमचे 2000 लोक भारतातील सरकारच्या नियमांनुसार काम करत आहेत. भारत सरकारच्या या निर्णयाचे अनेक भारतीय कंपन्यांनी स्वागत केले आहे. टिकटॉकशी स्पर्धा करणारे व्हिडीओ चॅट अ‍ॅप रोपोसोची मालकीची कंपनी इनमोबी म्हणाली की, हे पाऊल त्याच्या व्यासपीठासाठी बाजारपेठ उघडेल. भारतीय सोशल नेटवर्क शेअरचॅटनेही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.