‘कोरोना’वरून श्रीलंकेच्या तुरूंगात धुमश्चक्री, 8 कैद्यांचा मृत्यू तर 50 हून जास्त जण जखमी

कोलंबो : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे श्रीलंकेत एक हिंसक घटना घडल्याचे समोर आले आहे. राजधानी कोलंबोच्या महारा जेलमध्ये १७५ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे इतर कैद्यांनी जेलचा दरवाजा तोडून पळण्याचा प्रयत्न केला कैदी आणि तुरुंग अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीत ८ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ५० जण जखमी झाले आहेत. .

कोरोनामुळे क्षमतेपेक्षा जास्त कैदी या तुरुंगात ठेवले होते. त्याला काही कैद्यांनी विरोधही केला होता. त्यानंतर तुरुंगांत कैद्यांनी आंदोलने केली आहेत. पण तरीही जेल प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे कैद्यांमध्ये असंतोषाचे वातावरण चिघळले.काही कैदी जेलचा दरवाजा उघडून पळण्याच्या बेतात होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अधिकाऱ्यांनी बळाचा वापर केला. यामध्ये ८ कैद्यांचा मृत्यू झाला. दरम्यान कैद्यांनी दंगा घालत किचन आणि रेकॉर्ड रुमला आगा लावली.

पोलीस प्रवक्ते अजित रोहाना यांनी सांगितले की, कोलंबोपासून १५ किमी लांब महारा जेल आहे. त्यामध्ये कैद्यांनी दंगा घातला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांना कठोर पाऊले उचलावी लागली. या घटनेत दोन जेलरसह ५० जण जखमी झाले आहेत. जखमींना रागामा ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

You might also like