शपथविधीपूर्वीच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’वर केली खास पूजा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांचं सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं अजित पवारांच्या मदतीने आज अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घडवून आणला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आधी मुंबईतल्या निवासस्थानी होम हवन केला होता अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. या पूजेचे फोटोही समोर आले आहेत.

वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आधी मुंबईतल्या निवासस्थानी होम हवन केला होता. रात्री एक ते दीडच्या आसपास हवन आणि अनुष्ठान देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं. माळव्यातल्या नलखेडा इथले माँ बगलामुखी मंदिरातले 4 पंडित हे खास अनुष्ठान करण्यासाठी आले होते. या अनुष्ठानाने बगलामुखीचा आशीर्वाद मिळाला तर विजय निश्चित असतो अशी श्रद्धा आहे. माता बगलामुखी मंदिर मध्य प्रदेशातल्या माळव्यातलं तंत्रविद्येसाठीचं प्रसिद्ध मंदिर आहे. महाभारत युद्धापूर्वी पांडवांनी विजयासाठी या मंदिरात याच देवतेला प्रसन्न करून घेतलं होतं, अशीही अख्यायिका आहे.

आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली असून राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात घडलेल्या या अनपेक्षित राजकीय घटनेने महाराष्ट्रातील जनता आश्चर्यचकित झाली आहे तर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

Visit : Policenama.com