सर्वसामान्यांसाठी खुशखबर ! ‘या’ महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे धास्तावलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण येत्या काळात घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे. दर सहा महिन्यांनी गॅसचे दर निश्चित करण्यात येतात.

पहिल्या सहामाईचे दर एप्रिल आणि दुसऱ्या सहामाईचे दर ऑक्टोबर महिन्यात निश्चित करण्यात येतात. सध्या एप्रिल महिन्याचे दर निश्चित झाले असून आता ऑक्टोबर मध्ये जाहीर करण्यात येणारे दर 1.90 ते 1.94 डॉलर प्रति एमएमबटीयू (ब्रिटीश थर्मल यूनिट) इतके असू शकतात. जवळपास गेल्या दशकभरामध्ये नैसर्गिक वायूच्या किंमतीत झालेली ही सर्वात मोठी घट असणार आहे. गॅस निर्यात करणाऱ्या देशांकडून बेंचमार्क दरांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2020 पासून नैसर्गिक वायूच्या किंमती निर्धारित करण्यात येतील. परिणामी गॅसचे दर कमी होऊन 1.90 वरुन 1.94 प्रति मिलियन एमएमबीटीयू इतके होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर एका वर्षात नैसर्गिक वायूच्या दरात कपात होण्याची ही तिसरी वेळ असणार आहे.