शिवसेनेच्या ‘त्या’ आमदाराविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मतदार संघ नसतानाही नालासोपारा येथे आल्याने शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर त्या मतदारसंघात जे मतदार नाहीत. अशा सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी त्या मतदारसंघात उपस्थित राहू नये. प्रचाराचा कालावधी संपल्यावर त्यांनी तो मतदारसंघ सोडावा असा आदेश निवडणुक आयोगाने दिला आहे.

शिवसेनेचे आमदा रवींद्र फाटक हे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांचे निवडणूक प्रतिनिधी असलेले जितेंद्र शिंदे यांच्या नालासोपारा येथील प्रचार कार्यालयात मध्यरात्री एक वाजता आले होते. फाटक यांच्यासमवेत जितेंद्र शिंदे, प्रवीण म्हापरलकर, हेमंत पवार, नवीन दुबे, असे १५ ते २० जण जमले होते. ही बाब समजताच नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आचारसंहिता पथक शशिकांत पिंपळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्हिडिओ शुटींग केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक डॅनिलय जॉन ब्रेन यांनी तुळीज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आमदार रवींद्र फाटक यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.