विधान परिषद निवडणूक : काँग्रेसनं केलं मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं ‘टेन्शन’ दूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या रिक्त जागांवर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केले. मात्र, काँग्रेसने 2 उमेदवार दिल्याने 9 जागांसाठी 10 उमेदवार झाल्याने निवडणूक होणार असे वाटत होते. मात्र, काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेण्याची घोषणा केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

महाविकास आघाडीकडून सहा उमेदवारांची घोषणा झाली होती. यामध्ये काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले. काँग्रेसने दोन उमेदवार राष्ट्रवादीला खटकत असल्याने शिवसेनेला पुढे करत किंवा मुख्यमंत्री नाराज असल्याचे दाखवत राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर कुरघोडीचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान आघाडी असताना राष्ट्रवादीच्या वाट्याला अधिकचे का, असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित झाला. मात्र, अखेरीस काँग्रेसने माघार घेतली.

काँग्रेस आपला एक उमेदवार मागे घेत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे निवडणूक होऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. अखेर काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेऊन मुख्यमंत्र्यांची इच्छा पूर्ण केली.

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी संख्याबळानुसार, आघाडीच्या पाच जागा सहज निवडून येतात. तर सहाव्या जागेसाठी आघाडीला इतरांची मते लागतील. असेच चित्र भाजपच्याही बाबतीत आहे. भाजपच्या तीन जागा सहज निवडून येतात. तर चौथ्या जागेसाठी भाजपलाही काही मतांची गरज आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा होता. परंतु यात काँग्रेसने एक जागा घ्यावी असा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता.

वास्तविक काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीने एक उमेदवार घोषित केला असता तर आघाडी धर्माचे पालन झाल्यासारखे चित्र निर्माण झाले असते, असे काँग्रेसला वाटते. मात्र, काँग्रेसने दोन उमेदवार घोषित केल्यानंतर राष्ट्रवादीने कुरघोडी करत आपले दोन उमेदवार घोषित केले. त्यासाठीच हे दबावाचे राजकारण राष्ट्रवादी खेळत असल्याची तक्रार काँग्रेस नेत्यांनी केली होती.