केंद्राने शेतकर्‍यांची जमीन हिसकावली ! काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा आणि राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारने मनमानी करत शेतकर्‍यांची जमीन आणि पाणी त्यांच्यापासून हिसकावून घेतले आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे.

शेतकर्‍यांना सरकारने बड्या उद्योगपतींच्या हवाली केले असा आरोपही काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात आणलेले विधेयक हे घोडा होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले विधेयक हे गाढव आहे अशी टीका काँग्रेसचे खासदार अहमद पटेल यांनी केली आहे. विधेयक हे शेतकर्‍यांच्या हिताचेच आहे. किमान आधारभूत किंमत आणि सरकारी खरेदी बंद होणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. शेतकर्‍यांसाठी हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी दिवस असल्याचेही त्यांनी सांगितले. विधेयकाविरोधात हरियाणा आणि पंजाबमध्ये जोरदार आंदोलन सुरू झाले आहे. अंबाला येथील सदोपूर बॉर्डरवर यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा फवारा मारला.