कॉंग्रेसच्या अडचणीत भर ; अशोक चव्हाणांच्या उमेदवारीवर टांगती तलवार

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील उमेदवारीवर दोन अपक्ष उमेदवारांनीच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या आक्षेपांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून रात्री साडे नऊला निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांची उमेदवारी धोक्यात असल्याची चिन्हं आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून पत्नी अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. परंतु कॉंग्रेस हायकमांडने नांदेडमधून अशोक चव्हाण यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्जही भरला. परंतु, दोन अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी आपल्या अर्जामध्ये गॅस एजन्सीचा उल्लेख केला नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा अशी तक्रार त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. त्यांच्या या अर्जावरील निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी राखून ठेवला आहे. रात्री साडेनऊ वाजता यावर निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.