मुंबईत पुन्हा राजकीय खलबतं, आता बाळासाहेब थोरातांनी घेतली CM ठाकरेंची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मुंबईत भेट घेतली. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय खलबतं पहायला मिळाली. या ठिकाणी बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसर, महसूल खात्यातील काही महत्त्वाच्या बदल्या या 31 जुलै पर्यंत होणार आहेत. यापार्श्वभूमवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत महसूल विभागातील बदल्यांच्या बाबतीत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी गृह विभागातील बदल्यांमुळे राज्याच्या राजकारणात नाराजी नाट्य पहायला मिळाले होते.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरून मोठं राजकीय नाट्य पहायला मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा तसे नाराजी नाट्य होऊ नये म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे. महसूल खात्यातील बदल्यांच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी काळात कशा प्रकारे पुढील वाटचाल ठेवायची याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री यांच्यात चर्चा झाल्याचे समोर येतंय.

तसेच या बैठकीबाबत असेही समजतय की, मागील काही काळात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. अशातच सध्याचं राजस्थानमधील राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसला विश्वास देण्यासाठी या दोन नेत्यांमध्ये बैठक झाल्याचे समजतय.