सचिन पायलट यांनी 35 कोटींची ‘ऑफर’ दिली होती, काँग्रेस आमदाराचा ‘गौप्यस्फोट’

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील राजकीय नाट्य आता उच्च न्यायालयात पोहचले आहे. न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच काँग्रेसच्या आमदारांनी सचिन पायलट यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री असताना सचिन पायलट यांनी 35 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा काँग्रेसचे आमदार गिरीराज सिंह यांनी केला आहे.

आमदारांच्या घोडेबाजारावरून राजस्थानात राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. पोलिसांनी नोटीस पाठवल्यानंतर नाराज झालेल्या सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस विरोधात बंडखोरी केली. काँग्रेसनं परत येण्याचं आवाहन केल्यानंतर देखील पायलट यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली. सचिन पायलट यांच्याकडे असलेले उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. तर विधानसभेच्या अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह समर्थक 19 आमदरांना सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस पाठवली. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात असून यावर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनी सचिन पायलट यांच्याविषयी मोठा दावा केला आहे.

काँग्रेसचे आमदार गिरीराज सिंह म्हणाले, मी रेकॉर्डिंग केलेली नाही. रेकॉर्डिंग करण्याबद्दल माहिती नाही. ना मी कधी खोटे आरोप लावत नाही. भाजपवाल्यांनी माझ्यासोबत कधीच चर्चा केली नाही. विरोधी पक्षातील आहेत म्हणून खोटे आरोप लावणे हे चुकीचे आहे. माझी चर्चा सचिन पायलट यांच्यासोबत झाली. त्यांनी पैशाबद्दल चर्चा केली. ते म्हणाले होते जितके हवे तितके पैसे घ्या असं ते म्हणाले होते. 35 कोटींची ऑफर देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. तसेच ते उपमुख्यमंत्री असताना दोन तीन वेळा माझी त्यांच्यासोबत भेट झाली होती. मी त्यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना यांची माहिती दिली होती. त्यावर ते मला म्हणाले होते की सगळं काही ठिक होईल, अशी माहिती आमदार गिरिराज सिंह यांनी दिली.