उदयनराजेंना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची नवीन ‘व्यूव्हरचना’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले भाजपात सामील झाले आहेत. त्यामुळे या जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उदयनराजेंची राजकीय कोंडी करण्याचे ठरवले आहे.

उदयनराजेंना पराभूत करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने नवीन डाव आखला असून ही जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली आहे. या जागेतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उतरविण्यासाठी शरद पवार यांनी आग्रह धरला आहे. त्याला काँग्रेसचाही पाठिंबा आहे. 26 सप्टेंबरला काँग्रेसच्या छाननी समितीची बैठकीत चव्हाणांच्या नावावार शिक्कामोर्तब होऊ शकते. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

उदयनराजे भोसले यांनी अमित शाह यांच्या उपस्थित दिल्लीमध्ये शनिवारी भाजपात प्रवेश केला. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. उदयनराजे राष्ट्रवादीमध्ये असताना, राष्ट्रवादीसाठी ही जागा एकतर्फी विजयाची होती. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे.

Visit : policenama.com