सरकार स्थापनेचं शिवसेनेचं स्वप्न भंगणार, काँग्रेसच्या ‘या’ बडया नेत्याचं मोठं विधान

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरु असताना आता काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी देखील शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. संजय निरुपम यांच्यानंतर शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षेला धक्का बसला आहे.

सुशीलकुमार शिंदे यांनी याविषयी बोलताना म्हटले कि, काँग्रेसने शिवसेनेबरोबर जाऊ नये, जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा जनतेने दिलेला कौल मान्य करून पक्षाने विरोधी पक्षात बसावे, अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे. तसेच आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

राज्यभरात शिवसेना आणि काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरु असताना आणि काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्लीला हायकमांडला भेटायला गेले असताना शिंदे यांनी केलेल्या या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. त्याआधी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देखील काँग्रेस शिवसेनेच्या पाठीशी कसे राहील ? असा प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून केला होता. याचसंदर्भात आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आपल्या शिष्टमंडळासह काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट होणार असून यामध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्यासंबंधी चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते असणार आहेत. त्यामुळे आता संजय निरुपम यांच्या मताला किती महत्व राहते हा मोठा प्रश्न आहे.

दरम्यान, या दोन नेत्यांनी विरोध केल्यानंतर आणि शरद पवार यांनी देखील पाठिंबा देण्याची शक्यता नाकारल्यानंतर आता काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्लीवरून आल्यानंतर काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com