काँग्रेसकडून संजय राऊतांवर पलटवार, अडाणीपणाची लेखनकामाठी करूण ‘हौस’ भागवू नये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   शिवसेना पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या अंतर्गत विषयावर भाष्य करून टीका केली होती. यावर काँग्रेस पक्षानेही संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय. तसेच अडाणीपणाची लेखनकामाठी करून हौस भागवू नये, असेही म्हंटलंय.

दुर्दैवाने आज विरोधी पक्ष मजबूत दिसत नाही. काँग्रेस पक्ष जर्जर झालाय, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर काँग्रेस पक्षानं आता पलटवार केला आहे. धड न पत्रकार, धड न राजकारणी अशा अर्धवटरावांनी काँग्रेस पक्षाचा इतिहास, त्याची धोरणे, कार्यक्रम, जनाधार याविषयी अडाणीपणाची लेखनकामाठी करून आपली हौस भागवून घेऊ नये, त्याऐवजी आपल्या स्वतःच्या पक्षाचा इतिहास, विचारशून्य राजकारण, वाटचाल आणि केवळ सत्तापदावरून ऐन वेळी मारलेली कोलांटी यावर आत्मपरीक्षण करावे, असा पलटवार काँग्रेस नेते रत्नाकर महाजन यांनी केलाय.

आघाडीच्या राजकारणात सहकारी पक्षावर भाष्य करताना संयम बाळगावा लागतो, याचेही भान ठेवावे, असाही सल्लाही त्यांनी दिलाय.

काँग्रेस पक्ष हा त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालेला दिसत आहे. त्याची मलाही वेदना आहे. मी त्या विचाराचा नसलो तरी देशाच्या राजकारणामध्ये प्रमुख पक्ष टिकले पाहिजेत. तरच या देशाची संसदीय लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकू शकते, असे संजय राऊत म्हणाले होते.

मधल्या काळात 23 नेत्यांनी जे काही सोनिया गांधी यांना पत्र पाठवले, त्यावरचा वाद अजून क्षमलेला नाही. त्यातून काँग्रेस पक्ष जास्त खिळखिळा होतोय की काय?, अशी मला भीती वाटत आहे. त्या 23 नेत्यांची मागणी योग्य आहे. काँग्रेसला योग्य नेतृत्व मिळावे, यासाठी राहुल गांधींनी पुढाकार घ्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिलाय. काँग्रेस पक्षाला गांधी कुटुंबीयांशिवाय पर्याय नाही, ही लोकभावना आहे.

काँग्रेसचा अंतर्गत विषय देशाच्या राजकारणाशी संबंधित आहे. काँग्रेस पक्षातून फुटून ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, शरद पवार, जगनमोहन रेड्डी यांनी स्वतःचे पक्ष तयार केलेत. त्यामुळे काँग्रेसचा सारखा पक्ष हा राष्ट्रीय राजकारणामध्ये टिकला पाहिजे. समोर प्रबळ विरोधी पक्ष असल्यानंतर सत्ताधार्‍यांना काम करण्याचा उत्साह येतो. राज्यात आमच्या समोर एक प्रबळ विरोधी पक्ष उभा आहे, ज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असेही खासदार संजय राऊत म्हणाले होते.