कॉंग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर संजय राऊत ‘रोखठोक’ बोलले, म्हणाले – ‘गुजराती जनतेने का नाकारले याचा विचार करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  गुजरातमधील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र काँग्रेसची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. काँग्रेस पक्षाची अवस्था अशी का, याचा विचार पक्षाने करायला हवा. गुजरातच्या जनतेने आपल्याला का नाकारले याबद्दल कॉंग्रेसने विचारमंथन करावे, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. गुजरातमधील सूरत सारख्या महापालिकेत आपने प्रवेश केला आहे आणि त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. याचा विचार काँग्रेसने करावा असेही राऊत यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये भाजपने 6 पैकी सहा महापालिका आपल्याकडे कायम राखल्या आहेत. एकूण 575 पैकी 483 जागा जिंकत भाजपने महापालिका निवडणुकीत आपला करिश्मा दाखवून दिला. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाने निवडणुकीत चांगल यश मिळवले आहे. त्यावर खासदार राऊत यांनी भाष्यं केले आहे. गुजरातमधील कामगिरीचा विचार काँग्रेस पक्षाला करावा लागेल. आम्हा सगळ्यांना करावा लागेल. आपला चांगल यश मिळाले आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. पण काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाला जनतेन नाकारलं आहे. गुजरात असो वा इतर राज्यात काँग्रेसला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. काँग्रेसचे या प्रकारे होणारे पतन लोकशाहीसाठी योग्य नसल्याचे राऊत म्हणाले.