शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा ? 4 वाजता होणार निर्णय जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेनेकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असताना काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते दिल्लीला जाणार असून त्यानंतर चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे.

तत्पूर्वी जास्त संख्याबळ असलेल्या भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भाजपने शिवसेनेने आपल्याला साथ न दिल्याने हा निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना मोठा वेग आला होता. राज्यात राष्ट्रवादीमध्ये सुद्धा मोठी खलबते सुरु आहेत.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठींबा द्यावा यासाठी अनेक काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेसने जयपूरला आपल्या सर्व आमदारांचा ताफा हलवल्याने आता जयपुरवरून काँग्रेसचे प्रमुख नेते दिल्लीला येऊन सत्ता स्थापनेबाबतच्या निर्णयावर चर्चा करणार आहे. आज संध्याकाळी चार नंतर ही चर्चा झाल्यावरच काँग्रेसच्या निर्णयाचा खुलासा होणार आहे.

राज्यात जनतेने कोणत्याच पक्षाला बहुमत न दिल्याने कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही अशात शिवसेनेने भाजपला युतीसाठी साथ न दिल्याने भाजपने विरोधात बसण्याचा निर्णय जाहीर केला होता. अशात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com