पाऊस पडल्यावर सरकार दुष्काळी मदत देणार का ? : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात दुष्काळी परिस्थिती अतिशय गंभीर असून पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्यापर्यंतच्या तक्रारीची संख्या वाढत आहे. जनावरांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता या दोन्ही समस्यांनी दुष्काळग्रस्त भागातील जनतेचे जगणे असह्य झाले असून सरकार पाऊस पडल्यावर दुष्काळी मदत देणार आहे का ? असा सवाल काँगेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून सरकारवर टीका करताना अशोक चव्हाण म्हणाले की, ‘पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर जत भागात तर जुन्नरमध्ये गिरीश महाजन नुकतेच भेट देण्यास गेले असता या दोन्ही मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या संतापला सामोरे जावे लागले. यातूनच जनता किती त्रस्त आहे हे दिसून येते. मात्र सरकारकडून दुष्काळ गांभीर्याने घेतला जात नाही. दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असून केंद्र सरकारकडून राज्याला निधी मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र केंद्राकडून मदत मिळवण्यात एवढा उशीर का झाला ? राज्य सरकारने केंद्राकडे जी मदत मागितली ती उशिरा आल्याने दुष्काळी भागातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. जनावरांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता या दोन्ही समस्यांनी दुष्काळग्रस्त भागातील जनतेचे जगणे असह्य झाले असून सरकार पाऊस पडल्यावर दुष्काळी मदत देणार आहे का ?

राज्यात भीषण दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. सर्वाधिक दुष्काळाच्या झळा मराठवाड्याला सोसाव्या लागत आहेत. राज्यातल्या २६ जिल्ह्यांमध्ये असलेल्या १५१ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यांपैकी ११२ तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती असून ३९ तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळी परिस्थिती आहे.