पुण्यातील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला सक्तीच्या सेवानिवृत्तीची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नियुक्तीला असताना पोलीस दलाच्या शिस्तीचे उल्लंघन करत अशोभनिय व बेशिस्त काम करत पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचे कृत्य केल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला सक्तीच्या सेवानिवृत्तीची शिक्षा देण्यात आली आहे. याबाबतची विभागीय चौकशी पुर्ण केल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करत असल्याचा आदेश काढला आहे.

उत्तम जनार्दन गट असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

उत्तम जनार्दन गट हे पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पारपत्र व चारित्र्य पडताळणीचे काम त्यांच्याकडे देण्यात आले होते. त्यावेळी त्यांना वरिष्ठांचे आदेश असतानाही ते २० ऑगस्ट २०१८ रोजी पोलीस गणवेशाव्यतिरिक्त साध्या गणवेशात कामावर हजर होते.

त्यासोबतच त्यांनी रिक्षा बॅचच्या पडताळणी प्रकरणात आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केलेली असतानाही स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ती कागदपत्रे स्वत:जवळ ठेवली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

वरिष्ठांनी केलेल्या विभागीय चौकशीत ते दोषी आढळले. पोलीस नाईक उत्तम गट यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचे काम केल्याने तसेच त्यांनी कर्तव्यात कसूरू करत बेशिस्त वर्तन केल्याने त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.