‘कोरोना’तही नातं अतूट, बहिणींच्या राख्या ‘ऑनलाईन’ भावांच्या मनगटात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – रक्षाबंधन देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो. बहीण भावाला राखी बांधते व त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला सुरक्षेचं वचन देतो. दूरवर राहणाऱ्या या बहिणीनं पाठवलेली राखी… ती हातात बांधताना तिच्या आपलुकीचे स्मरण होते. कोरोना संकट असतानाही अशा बहिणी ऑनलाइनचा पर्याय निवडत राख्या पाठवत आहेत. बहिण दूरवर आपल्या सासरी असली तरी कोरोनाच्या संकटात देखील हे बहिण भावाचं नात टिकून आहे. पोस्टाने देखील राख्या पाठवल्या जातात मात्र, याला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
दूरवर राहणाऱ्या आणि कोरोनामुळे त्याच्याकडे जाता येत नसल्याने ऑनलाईनचा पर्याय सध्या वापरला जात आहे. दूर असलेल्या भावाला ऑनलाईनद्वारे पाठवलेली राखी काही तासांच्या आतमध्ये भावाला मिळते. त्यासाठी तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही. अगदी एका क्लिकवर राखी मिळत आहे. राख्या हव्या त्या पत्यावर पाठवल्या जाऊ शकतात. भावाने राखी बांधून घेतल्यानंतर त्यांचीही ऑनलाईन भेट बहिणीला ऑनलाईनद्वारेच मिळते..

अशा आहेत ऑनलाइन राख्या
सध्या राज्यामध्ये कोरोनाचे संकट असल्याने ऑनलाईन खरेदीला मागणी वाढली आहे. कोरोनाच्या संकटात देखील यंदा राख्यांच्या ट्रेड्समध्ये वैविध्य पहाण्यास मिळत आहे. फॅन्सी, मोती, शिंपले, मोदी, रुद्राक्ष, लॉकेट, भावाच्या फोटोसह, नवासह कस्टमाईज्ड राख्या कूल ब्रो, फूड राखी, ऑनलाईन गेम्स वेडे, प्लांटेबल सीड राख्यांचे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. राखीची लांबी काय, राखीवर कोणती कलाकृती साकारण्यात आली आहे, देखील पहाता येणार आहे.

डाक विभागाचे खास पाकीट
रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी डाक विभागही सरसावला आहे. बहिणीला आपल्या लाडक्या भावाला राखी पावठता यावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून डाक विभाग खास पाकीट उपलब्ध करून देत आहे. यंदा डाक विभागाने या पाकिटाचा आकार वाढवला आहे. त्यावर ‘राखी पाकीट’ असा उल्लेख केला गेला आहे.