PMP च्या आदरांजली योजनेवर देखील ‘कोरोना’चे सावट !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी ‘आदरांजली’ ही योजना सुरू केली होती. मात्र, आता या योजनेवर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. या योजनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रत्येकी ५० रुपये कपात करण्यात येत होती. टाळेबंदीदरम्यान ही कपात केली नसल्याने या काळात निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना ही मदत मिळणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

‘आदरांजली’ या योजनेत सुमारे ८ हजार कर्मचारी व अधिकारी स्वेच्छेने सहभागी झाले आहेत. या योजनेसाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ५० रुपये कपात करणे अपेक्षित होते. ही रक्कम निधन झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसदारांना देण्यात येते. परंतु, टाळेबंदीत पीएमपीचे बससेवा ठप्प होती. यामुळे अनेक कमर्चाऱ्यांना वेतनही मिळाले नाही. ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही कपात करण्यात आली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या वेतनापासून ही कपात केली जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक कामगार अधिकारी सतीश गोटे यांनी काढले. त्यानुसार जानेवारी महिन्यात चार कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वेतनातून २०० रुपये कपात करण्यात येणार आहे.

दरम्यान, टाळेबंदी काळात काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले. या कर्मचाऱ्यांना ‘आदरांजली’ योजनेचा लाभ मिळणार की नाही, हा सवाल आता विचारण्यात येत आहे. तसेच यादरम्यान कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात आले नाही, तर अनेकांना कामही नव्हते. यामुळे ५० रुपये कपात केली नाही. त्याच अनुषंगाने या कालावधीत निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याबाबत संभ्रम आहे.

टाळेबंदीत काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. त्यांनासुद्धा ‘आदरांजली’ या योजनेचा लाभ द्यायचा असल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मोठी रक्कम कपात करावी लागेल. यामुळे याबद्दल अजूनही अस्पष्टता आहे.

– कामगार अधिकारी सतीश गोटे

You might also like