धक्कादायक ! 24 तासात 133 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण तर दोघांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्या ऐवजी वाढतच आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या तीन लाखांच्यावर पोहचली आहे. त्यातच लॉकडाऊन काळात गेल्या चार महिन्यांपासून पोलीस दिवसरात्र आपलं कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यावर ड्युटी करत आहेत. त्यामुळे पोलिसांचा अनेकांशी संपर्क येत असल्याने पोलिसांना देखील कोरोना होण्याचे प्रमाण वाढले आहे.

राज्यात गेल्या 24 तासामध्ये तब्बल 133 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 19 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर 2 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 184 कोरोना बाधित पोलीस अधिकारी आणि 1305 पोलीस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 97 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 7 पोलीस अधिकारी तर 80 पोलीस कर्मचारी यांच्या समावेश आहे.

कोरोनाच्या संकटाच्या काळात पोलीस गेल्या चार महिन्यांपासून सतत नागरिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र तैनात आहेत. पोलीस दलातही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या या कोरोना योद्ध्यांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.