पुण्यात ‘कोरोना’चं संकट वाढलं, शहरातील ‘या’ भागात कडक निर्बंध लागू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे संक्रमित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये याचा वेग अधिक वाढला आहे. बुधवारी (दि.8) 1147 रुग्णांची वाढी झाली तर संपुर्ण जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 1618 नवीन रुग्ण आढळून आले. पुण्याच्या ग्रामीण भागात एकाच दिवशी 168 रुग्ण आढळून आल्याने पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 32596 वर पोहचली आहे. कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता पुणे शहरातील काही भागांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

कोरोना प्रसार रोखण्यासाठी शहरालगतच्या हिंजवडी आणि मारुंजी परिसरामध्ये आजपासून (गुरुवार दि. 9) 8 दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 9 जुलै ते 16 जुलै या कालावधीत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून या कालावधीत केवळ दूध, मेडिकल आणि दवाखाने सुरु असणार आहेत. मात्र या भागातील आयटी कंपन्यांना यातून सूट देण्यात आली आहे.

दुसरीकडे हवेली तालुक्याील नांदेड गाव, खडकवासला, किरकीटवाडी, नऱ्हे, मांजरी, पिसोळी, वाघोली, न्यू कोपरे, खानापूर, गुजर निंबाळकरवाडी, वडाची वाडी, लोणी काळभोर, भिलारे वारे, उरूळी कांचन, शेवाळेवाडी, भिलारे वाडी कदमाक वस्ती, कुंजीर वाडी हे भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत असून शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पुण्याचे प्रथम नागरिक आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर माजी महापौर आणि आमदार मुक्ता टिळक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पालिकेतील अनेक नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.