गुजरातमध्ये ‘कोरोना’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही निगेटिव्ह दाखवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातच्या राजकोट आणि जामनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण ( Covid-19 patients) कमी दाखविण्यासाठी कोरोनाग्रस्त रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असले तरीही ते निगेटिव्ह दाखविण्याचा (came-positive-register-negative) खेळ खेळला जात आहे. आरोग्य विभागाचे अधिकारीच यात गुंतलेले असून त्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना निगेटिव्ह दाखविण्याची तंबी कर्मचाऱ्यांना दिली आहे. यामुळे या मोठ्या षडयंत्राचा भांडाफोड झाला आहे. राजकोट मनपा, राजकोटमधील गावे आणि जामनगर या तीन भागातील कोरोना रुग्णांचे आकडे कमी दाखविण्यासाठी विविध प्रकार अवलंबण्यात आले. यामध्ये पालिका आयुक्तांपासून आरोग्य खात्याचे मोठमोठे अधिकारी सहभागी असल्याचे आढळले आहे.

काही दिवसांपूर्वी थायरोकेअर लॅबच्या सीईओंनीच राज्य सरकारांवर गंभीर आरोप लावले होते. राज्य सरकारांची बदनामी होईल या भीतीने कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी लपविण्याचे कृत्य करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप थायरोकेअर (Thyrocare) ने केले होते. Thyrocare Technologies चे सीईओ वेलुमनी यांनी सांगितले की, काही राज्यांनी थायरोकेअरला सांगितले आहे की, कोरोनाच्या चाचण्या घेऊ नका. तर काही राज्यांनी कोरोना रुग्णांचे आकडे आयसीएमआरला देऊ नयेत किंवा त्यामध्ये हेराफेरी करावी, असे सांगितले आहे. गुजरातमधील हेराफेरीचे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे. यासाठी राजकोट आणि जामनगर भागातील रॅपिड अँटिजन किटद्वारे केलेल्या 3.5 लाख रेकॉर्ड तपासले. यापैकी अनेक रुग्णांशी फोनवर संपर्क साधला. यामुळे या मोठ्या षडयंत्राचा भांडाफोड झाला आहे.

990 रुग्णांना निगेटिव्ह दाखविले
जिल्हा आरोग्य कचेरीच्या मेलआयडीवरून जामनगरच्या सर्व हॉस्पिटल अधिकाऱ्यांना मेल आला होता. या मेलला जोडलेल्या लिस्टसारखी अँटीजेन निगेटीव्हची नोंद करायची आहे. चुकूनही पॉझिटिव्ह म्हणून कोणाची नोंद होता नये असे आदेश दिले होते. मेलमध्ये पाठविणाऱ्याचे नाव डॉ. बीपी मणवर असे लिहले होते. यामध्ये 900 कोरोना रुग्णांचे नाव होते.

5325 पॉझिटिव्ह असताना दाखविले 3720
मनपाच्या तुलनेत जिल्हा आरोग्य विभागाची पद्धत वेगळी आहे. जिल्ह्यात जेवढ्या रुग्णांची चाचणी केली जाते त्यांचे नाव, मोबाईल नंबर रजिस्टर केला जातो. मात्र, ते पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे लिहिले जात नाही. मात्र, जेव्हा यादी जाहीर करण्याची वेळ येते तेव्हा अधिकारी रोजची संख्या ठरवितात. अशाप्रकारे राजकोट जिल्ह्यात 5325 पॉझिटिव्ह असताना 3720 दाखविल्याचे समोर आले आहे.