दावा : 6 दाने चघळण्याने होणार नाही ‘कोरोना’ व्हायरस, सरकारी हॉस्पीटलमध्ये औषधांचं वाटप, जाणून घ्या

राजगड : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. भारतातही या व्हायरसने पीडित रूग्णांची संख्या 33 झाली आहे. यापासून बचाव करण्यासाठी देशातील सरकारी हॉस्पिटल आपआपल्या पद्धती अजमावत आहेत. मध्य प्रदेशातील अशाच एका सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत होमीओपॅथीक औषध वाटण्याचा कॅम्प लावण्यात आला आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, हे औषध केवळ 3 दिवस घेतल्याने कोरोना व्हायरसचा अटॅक होणार नाही.

मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात आयुष आरोग्य शिबीर सुरू आहे, ज्यामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याचा दावा करणारे होमिओपॅथी औषध लोकांना मोफत वाटण्यात येत आहे. हे औषध घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम -30 हे औषध 3 दिवस रिकाम्या पोटी घेतल्यास कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे. राजगडमध्ये प्रभारी जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर मनोज चौहान यांनी सांगितले की, संपूर्ण देशात कोरोनाचे इन्फेक्शन पसरत आहे, यामुळे सर्व लोक घाबरलेले आहेत. होमिओपॅथीच्या या प्रतिबंधात्मक औषधाचे तीन डोस 3 दिवस लागोपाठ घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती आपोआप वाढते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आम्ही हे औषध वाटत आहोत.

आयुर्वेद होमिओपॅथी फार्मासिस्ट भोलाराम सूर्यवंशी यांनी सांगितले की, होमिओपॅथी कॅम्प सुरू करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस पसरत असल्याने, त्याच्यासाठी औषध बनवण्यात आले आहे. हे औषध आम्ही वाटत आहोत. किमान एक हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या औषधाचा डोस 3 दिवसाचा आहे. हे शरीरासाठी सुरक्षा कवच आहे. हे औषध घेतल्यानंतर कोरोना व्हायरसचा संसर्ग होत नाही. जेवढे रूग्ण हे औषध घेतील, तेवढ्या लोकांचा बचाव होईल. पोलिओप्रमाणे हे औषध अगोदरच दिले जात आहे. हे औषध झाकणात घेतल्यानंतर यातील 6 दाणे तोंडात टाकून चघळायचे आहेत. सकाळी रिकाम्यापोटी औषध घ्यायचे आणि अर्धा तास काहीही खाऊ नये. या औषधाला स्पर्श करायचा नाही, झाकणातून ते थेट तोंडात टाकायचे आहे. मुलांना याचे चार दाणे आणि मोठ्यांना 6 दाणे द्यायचे आहेत. हे औषध केवळ सकाळी खायचे आहे. आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसने पीडित रूग्णांची संख्या 31 होती, पंजाबमध्ये दोन प्रकरणे समोर आल्यानंतर आता ही संख्या 33 झाली आहे.