Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात ‘कोरोना’चा हाहाकार ! सलग दुसर्‍या दिवशी 4 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज दिवसभरात 191 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून मागील चार दिवसांमध्ये शहरामध्ये एक हजार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या चार हजारापर्यंत पोहचली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचा समावेश आहे. यानंतर शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 89 झाली आहे. यामध्ये 32 रुग्ण पुणे आणि इतर शहरातील आहेत. ज्यांच्यावर पिंपरी चिचंवड शहरात उपचार सुरु होते.

10 मार्च रोजी शहरात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. साडे तीन महिन्यात शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज अखेर 3967 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 2369 रुग्ण बरे झाले झाले आहे. आज एकूण 191 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या व्यतिरिक्त पुणे आणि परिसरातील 18 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यांच्यासह 102 रुग्णांवर पिंपरी चिंचवडमध्ये उपचार सुरु आहेत.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज चिंचवड येथील एम्पायर इस्टे येथील 78 वर्षाची महिला, निगडी सेक्टर 25 मधील 62 वर्षीय महिला, सानेवस्ती चिखली येथील 48 वर्षीय पुरुष, वाल्हेकरवाडी चिंचवड येतील 61 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात एकूण 191 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज शहरात 79 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये 1532 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.